
नाशिक : पोलिस यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासह आचारसंहितेतील कारवायांमध्ये व्यग्र असताना गुन्हेगारांनी मात्र थेट रस्त्यावर उतरून उच्छाद मांडला आहे. शहरात दोन दिवसाआड मध्यरात्री गल्लोगल्ली तोडफोड किंवा वाहनांची जाळपोळ केल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणांत पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असल्या, तरी मध्यरात्री पेटणारं शहर नाशिककरांसाठी संतापजनक ठरत आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये आयुक्तालयाची सूत्रे हाती घेतल्यावर ‘स्ट्रीट क्राइम’ नियंत्रणासाठी धडक कारवाई सुरू केली. सतत कोम्बिंग आणि मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर टोळक्यांना ताब्यात घेत समज देण्यात आली. त्यामुळे फेब्रुवारी २०२४ पर्यंत शहरातील रस्त्यावरील गुन्हेगारी नियंत्रणात राहिली. मात्र, त्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यावर पोलिस यंत्रणा बंदोबस्तात व्यग्र झाल्याने गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे.
मतदानापूर्वी भद्रकालीत एकाच वेळी पाच ठिकाणी वाहने पेटविली. त्यानंतर पंचवटी, सिडको, इंदिरानगर व सातपूरमध्ये सलग असेच प्रकार घडले. सर्व गुन्ह्यांत संशयितांना अटक करूनही पोलिसांचा वचक निर्माण न झाल्याचे दिसते. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा रस्त्यावर उतरून टोळक्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


