रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात अनेकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावलेल्या आर्जू टेक्सोल कंपनीच्या दोन संचालकांना अटक करण्यात यश आले आहे, तर घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या एका संचालकांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. १५ महिने, ३६ महिने आणि ६० महिने या मुदतीवर कंपनीच्या स्किम व उद्योगाचे अमिष दाखवून लोकांच्या कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.
आतापर्यंत या प्रकरणात 115 जणांची साक्ष जिल्हा पोलिसांनी नोंदवली आहे. आर्थिक फसवणूक करण्यात आलेल्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे. आजवर चार जणांच्याविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी केवळ एका विरोधीकडून १८ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात घडलाय, याच बाबीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सत्य समोर आले. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली आहे. ठेवीदार राजेश प्रभाकर पत्याणे यांनी रत्नागिरी पोलिसात घोटाळ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कलम ४०६,४२०,३४,सह महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे सरंक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वयेद्वारे गुन्हा दाखल केला आहे.



