पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार सुरू असताना प्रसूती झालेल्या महिलेला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. या प्रक्रियेत 40 मिनिटे वेळ गेला आणि दुसऱ्या दिवशी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिजामाता रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आसवानी यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात आसवानी यांनी म्हटले आहे की, पिंपरी कैलाशनगर येथील श्वेता अश्विन यादव ही 30 वर्षाची गरोदर महिला 20 मे रोजी नियमित तपासणीसाठी जिजामाता रुग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. 21 मे रोजी दुपारी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. 22 मे रोजी त्यांना सकाळी साडे आठ वाजता ऑपरेशन थेठरमध्ये प्रसूतीसाठी नेण्यात आले. त्यांचे सीझर करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर बाळाला एनआयसीयुमध्ये ठेवण्यात आले. ऑपरेशन थेटरमधून बाहेर आल्यानंतर श्वेता यांना वायसीएम रुग्णालयात घेऊन जाण्यास डॉक्टरांनी सांगितले. अंतर्गत रक्तश्राव झाला आहे, राहिलेले उपचार वायसीएममध्येच होतील असे डॉक्टरांनी सांगितले. पण, स्पष्ट कारण सांगितले नाही.



