
पुणे : अपघातप्रकरणी सातत्याने येणाऱ्या नवनव्या बातम्या अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या आहेत. एका मुलाला वाचवण्याकरता अख्खं प्रशासन कसं कामाला लागलं होतं, याचे पुरावे विरोधकांकडून दिले जात आहेत. दरम्यान, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी काल (२९ मे) महाड येथील चवदार तळे येथे जाऊन मनुस्मृतीचे दहन केले. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोचाही अवमान झाला.
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे. जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही. आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे जयंत पाटील म्हणाले.



