मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित केली आहे; तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहेत; तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून अनिल बोरनारे यांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये झालेले सर्व सहकार्य मोडीत निघणार असून, भाजपवर आता राष्ट्रवादी आणि मनसेच्या विरोधात लढण्याची वेळ येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सहमती झाली होती. मनसेने महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता. आता लोकसभा निवडणूक पार पडली असून, त्याचा निकाल बाकी आहे. मात्र, त्याआधीच राज्यात मुंबई शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षण मतदारसंघ या चार ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक होत आहे.
यापैकी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, येथून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचे नाव निश्चित मानले जाते. मात्र, राज ठाकरे यांनी पानसे यांचे नाव घोषित करून भाजपची अडचण केली आहे.



