
आळंदी : आषाढी वारीला मागील वर्षी वारकरी आणि पोलिसांत झालेल्या झटापटीमुळे यंदा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी माऊलींच्या पालखी प्रस्थानाला मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात प्रति दिंडी नव्वद वारकऱ्यांना प्रवेश देण्याचं निश्चित झालं आहे.
गेल्या वर्षी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आळंदीत आज जिल्हा न्यायाधीश महिंद्र महाजनांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला वारकरी संप्रदायातील प्रमुख व्यक्ती, दिंडी मालक-चालक यांसह पोलीस आणि प्रशासन उपस्थित होते.
प्रति दिंडीमागे 90 वारकऱ्यांना प्रवेश
आषाढी वारीदरम्यान यंदा प्रति दिंडी 90 वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी मानाच्या 47 दिंड्या आणि 9 उपदिंडी अशा 59 दिंड्यांतील वारकऱ्यांची संख्या मर्यादित असावी, असा निर्णय वारकरी संघटनेनं घेतला आहे. मागील दोन वर्षांत पालखी सोहळ्याला काही कारणाने गालबोट लागलं, हेच टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रति दिंडी 100 वारकरी प्रवेशाची होती मागणी
प्रथेनुसार, पालखी सोहळ्यातील 56 दिंड्यांच्या वारकऱ्यांना प्रस्थानावेळी प्रवेश दिला जातो. गेल्या वर्षी ही संख्या प्रति दिंडी 75 इतकी होती. मात्र त्यावरून गदारोळ झाला अन् काही वारकऱ्यांनी जबरदस्तीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वारकरी आणि पिंपरी चिंचवड पोलिसांमध्ये झटापट झाली होती. याच पार्श्वभूमीवर यंदा प्रति दिंडी 100 वारकऱ्यांना प्रवेश देण्याची मागणी करण्यात आली. मात्र प्रातिनिधिक स्वरूपात 90 वारकऱ्यांना प्रवेश देण्याचं निश्चित झालं आहे.
मागील वर्षी वारकरी-पोलिसांत नेमका वाद कशामुळे?
11 जून 2023 ला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना त्यावेळी घडली. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. प्रति दिंडीमागे 75 वारकऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र त्याच वेळी काही वारकऱ्यांनी बॅरिकेड्स लोटून देत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस वारकऱ्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यात त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. त्यात पोलिसांनी आक्रमकपणे वारकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी पोलिसांनी हातातील लाठ्याही वारकऱ्यांवर उगारल्या. त्यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र हजारोंच्या संख्येने असलेले वारकरी आक्रमक झाले आणि काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

)


