पिंपरी : – आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक आणि भोसरीतील भाजपच्या नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज वाय बी. सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री आमदर जितेंद्र आव्हाड,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात बाजी मारली. या निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पैकी आठ खासदार निवडून आणत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. तसेच शिरूर लोकसभेत डॉ अमोल कोल्हे यांना मिळालेल्या जनसामान्याचे कौल लक्षात घेत पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या दिशेने जाण्याचे संकेत आता मिळू लागले आहे. भोसरीतील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उच्चशिक्षित भाजप नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात तुतारी जोरात वाजणार असल्याचे दिसत आहे.
भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून प्रवेश – बारसे
यावेळी बोलताना प्रियांका बारसे म्हणाल्या” भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. भाजपमधील अजून सहकारी आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत असे सांगत भोसरी भाजपला गळती लागणार असे नमूद केले.