
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएचे प्रमुख म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एनडीएला सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्तास्थापनेसाठीचं गणित जुळवता आलं नसलं, तरी नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या सहकार्याने मोदींनी हे गणित जुळवून आणलं. या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी पार पडला असून त्यांच्यासह एनडीएमधील अनेक वरीष्ठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
आधी मोदी, नंतर पहिले पाच मंत्री!
दरम्यान, यावेळी शपथ घेण्याचा निश्चित क्रम ठरलेला होता. त्यानुसार, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी तर पाचव्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डांच्या नंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली शपथ मराठीमध्ये…
मी नरेंद्र दामोदरदास मोदी.. ईश्वराची शपथ घेतो की.. मी कायद्याने स्थापित भारताच्या संविधानाबाबत सच्ची श्रद्धा आणि निष्ठा ठेवेन. मी भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित ठेवेन. मी या संघराज्याचा पंतप्रधान म्हणून आपल्या कर्तव्यांचं श्रद्धापूर्वक आणि शुद्ध अंत:करणाने पालन करेन. शिवाय मी भीती किंवा पक्षपात, राग वा द्वेष यापासून अलिप्त राहात सर्व प्रकारच्या लोकांबाबत संविधान आणि कायद्यानुसार न्याय करेन. मी… नरेंद्र दामोदरदास मोदी… ईश्वराची शपथ घेतो की… जो विषय संघराज्याचा पंतप्रधान म्हणून विचारार्थ माझ्यासमोर आणला जाईल किंवा मला माहिती असेल, त्याबाबत कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींकडे, तोपर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात सूचित किंवा जाहीर करणार नाही, जोपर्यंत पंतप्रधान म्हणून माझ्या विहीत कर्तव्यांचं पालन करण्यासाठी ते आवश्यक नसेल…
