
पिंपरी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभेमधून महायुतीला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आता महायुतीतील घटक पक्ष असणारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाकडून) अनेक इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. चिंचवड विधानसभा पोट निवडणूक लढवत एक लाखाच्या आसपास मतदान घेणारे नाना काटे यांनी चिंचवडमधून पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दुसरीकडे, माजी आमदार विलास लांडे लोकसभा निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक होते. पण, त्यांना तिकीट मिळाले नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाचा प्रभाव कायम ठेवायचा म्हणून अजित गव्हाणे यांनी यंत्रणा कामाला लावली. ज्या ठिकाणी मतदान कमी होत आहे. त्याचा ‘रिपोर्ट’ स्वतः अजित पवार त्रयस्थ यंत्रणेद्वारे घेत असून, त्या-त्या भागातील स्थानिक कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या जात होत्या. त्यामुळे भोसरीतून राष्ट्रवादी प्रचंड ‘अॅक्टिव्ह’ झाली असल्याचे दिसून आली. यांचा फायदा गव्हाणे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
लोकसभा निवडणूकीत पोलिंग बूथ यंत्रणेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि महायुतीच्या एकजुटीमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. परिणामी, लोकसभेत विरोधी उमेदवारापेक्षा घड्याळाचा गजर अधिकचा झाला. याचा फायदा घेण्यासाठी अजित पवारांचे विश्वासू शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तशी पोस्ट सोशल मीडिया वरती अजित गव्हाणे मित्र परिवाराच्या वतीने जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.
