बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार आता राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत. राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी त्या आज विधानभवनात दाखल झाल्या असून अजित पवार आणि सुनिल तटकरेही थोड्याच वेळात विधानभवनात दाखल होणार आहेत.
२०२४ ची लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. एनडीएने तिसर्यांदा सरकार स्थापन केले. आता राज्यसभेचे १० खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यसभेच्या (आरएस) सचिवालयाने सात राज्यांतील १० जागांवर लवकरच निवडणुका होणार असल्याचे अधिसूचित केले आहे. निवडणूक आयोगाने या १० जागांसाठी होणार्या निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत.
या १० जागांपैकी सात जागा भाजपा, दोन काँग्रेस आणि एक जागा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) कडे होती. काँग्रेस आणि आरजेडी हे दोन्ही इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. कनिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या भाजपाच्या राज्यसभा खासदारांमध्ये सर्बानंद सोनोवाल (आसाम), ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश) आणि पीयूष गोयल (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. तर, प्रफुल्ल पटेलांचीही एक जागा रिकामी होती. त्यामुळे या जागेवर कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.



