मुंबई : महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यंदाच्या वर्षभरात मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. उदय सामंत यांनी ट्वीट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.
राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे उद्योगमंत्री यांनी ट्वीट करत म्हटलं, “जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात चर्चा झाली.”
यावेळी मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर, पॉलिटिकल ऑपरेशन्स – एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्रीमती मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.
महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत पळवून नेल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांकडून करण्यात येत आहे. पण आता मर्सिडीज बेंझ कंपनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. तसेच या गुंतवणुकीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीतही देशात प्रथम क्रमांकावर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, राज्यात नवी रुग्णालये उभारण्यावर भर देण्यात येत आहे. पुणे ते संभाजीनगर नवा महामार्ग तयार करण्यात येत असल्याने नागपूरहून पुण्यात 6 तासांत येणे शक्य होईल. जेएनपीटीहून तीन पटीने मोठा असलेले वाढवण बंदरही विकसीत करण्यात येत आहे. महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीतही देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच देशातील सर्वोत्तम सायबर सुरक्षेची यंत्रणा उभी केली जात आहे. शिक्षण क्षेत्रावरही विशेष लक्ष केंद्रित करून नोकऱ्यांमध्येही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकूणच भारत जगाच्या आर्थिक विकासाचे महत्वाचे केंद्र होत असतांना देशाच्या विकासाचे महाराष्ट्र हे ‘ग्रोथ इंजिन’ आहे.
देशाच्या दरडोई उत्पन्नवाढीचा दर 4.5 टक्यांवरून 8.4 टक्क्यावर गेला आहे. महागाईचा दर दोन आकडी संख्येवरून 5 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. परकीय गुंतवणूक आणि निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मोठे प्रकल्प पूर्ण होण्याचा सरासरी कालावधीही कमी होत आहे.



