विधानसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. तसेच जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २८८ जागा लढण्याची तयारी सुरू असल्याचं सूचक विधान केलं होतं. त्यातच जागा वाटपाचा मुद्दा सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेत आहे.

 

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असल्याचंही बोललं जात आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भात चर्चेची प्राथमिक फेरी पार पडली आहे. याच अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किती जागा लढवणार? याबाबत आमदार रोहित पवार यांनी सूचक भाष्य केलं आहे. तसेच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनीच विधान केलं होतं. त्यामुळे नोव्हेबंरनंतर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कुणाच्या खांद्यावर? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर यावर आता आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच अजित पवार गटाचे आमदार संपर्कात आहेत का? यावरही रोहित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.