
राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणूक जोमाने लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केलेला आहे. दरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची माहिती आहे.
आगामी विधानसभेत काँग्रेस १०० ते १०५ , ठाकरे गट ९० ते ९५, आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ८० ते ८५ जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पुढील आठवड्यात प्रत्येक पक्ष सर्व्हे करणार आहे. ठाकरे गटाकडून जागांच्या चाचपणीला सुरुवात करण्यात आली आहे.
भास्कर जाधव यांनी विदर्भातील जागांचा आढाव घेतला आहे. काँग्रेसने देखील अंतर्गत सर्व्हे सुरु केला आहे. लोकसभेचा स्ट्राईक रेट बघता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.
मविआचा जागावाटपाबाबत निकष काय?
१) ज्याठिकाणी ताकद त्याठिकाणी जागा
२) विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि मुंबईतील काही भागात काँग्रेसची ताकद आहे.
३) कोकणसह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही भागात ठाकरे गटाची ताकद आहे.
४) पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद आहे
५) लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याचा निर्धार



