तळेगाव : मावळ तालुक्यात मोबाईल नंबर दिला नाही म्हणून एका 25 वर्षीय महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला. कान्हे परिसरातील एका कंपनीजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित महिलेने वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार आरोपीविरोधात वडगाव मावळ पोलिसांत भा.द.वी. कलम 307, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी संतोष मारूती लगली (वय 43 वर्षे, रा. मावळ तालुका) याला पोलिसांनी अटक केली आहे. आज, सोमवारी (दि. 17 जून) सकाळी 8 वाजता ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे दोघेही कान्हे परिसरातील एका कंपनीत एकाच विभागात कामाला आहेत. मागील अनेक दिवसांपासून आरोपी हा फिर्यादीकडे तिच्या मोबाईल नंबरची मागणी करत होता. परंतू फिर्यादीने वारंवार त्याला नकार दिला. त्याचाच राग मनात धरून आरोपीने आज (दि. १७) सकाळी फिर्यादी महिला कामावर जात असताना तिच्यावर चाकूने खुनी हल्ला केला. यात तिच्या पोटावर वार झाल्याने ती जखमी झाली. नंतर आरोपी तिथून पळून गेला. महिला त्याच अवस्थेत कंपनीत पोहोचल्यावर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास महिलेने स्वतः याबाबत पोलिसांत फिर्याद दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून उद्या (दि. १८ जून) त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक कुमार कदम यांनी दिली. पोसई सांगळे हे याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




