नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. येथे रुळावर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्सप्रेसला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
एनजेपीहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला सिलीगुडी ओलांडल्यानंतर रंगपनीर स्टेशनजवळ अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात आतापर्यंत 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मालगाडीच्या लोको पायलटचाही मृत्यू झाला आहे. रेल्वे चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन प्रवासी बोगी आणि एका पार्सल बोगीचे नुकसान झाले आहे. या अपघातात अनेक जण जखमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावरील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.




