पिंपरी ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान मिळावे यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणे व विविध सेलच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जोरदार मागणी केली आहे. राज्यस्तरावर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आघाडीवर असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खात्री आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या 70 वर्षाचा अनुशेष अण्णा बनसोडे यांच्या मंत्रीपदामुळे भरून निघेल असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.
अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून राज्यभर ओळख असलेले आमदार बनसोडे यांचा शहरातील दांडगा जनसंपर्क तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना मिळालेले मताधिक्य याच्या बळावर आमदार बनसोडे यांचा मंत्रीपद देऊन शहरातील सामान्य कार्यकर्ताला व समाजाला न्याय देण्याचे काम होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शहरातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार बनसोडे यांना मंत्रिपद मिळावे यास आशयाची निवेदने उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहेत.
यामध्ये शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय औसारमल, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, कार्याध्यक्ष फजल शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष युसुफ कुरेशी, सेवा दल शहराध्यक्ष महेश झपके, झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष संतोष निसर्गंध आधी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकंदरीत शहरातून आमदार बनसोडे यांना मंत्री पद मिळावे यासाठी जोरदार मोर्चे बांधणी होत असताना दिसून येते.




