बारामती: बारामती लोकसभा निवडणुकीनंतर बारामती मतदारसंघातील राजकारण बदलून गेले आहे. अजित पवारांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना ५० हजारांहून अधिकचे लीड मिळाले. अजित पवार आपल्या पत्नीला स्वतःच्या मतदारसंघातही लीड देऊ शकले नाहीत. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत होऊ शकते अशी शक्यता आहे. याबाबत युगेंद्र पवार यांनीही संकेत दिलेले आहेत.
शरद पवार (Sharad Pawar) हे युगेंद्र पवारांना घेऊन आतापासूनच मैदानात उतरले आहेत. पवारांनी संपूर्ण तालूका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हेच मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान काटेवाडीत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, ” संपूर्ण बारामती आपलं घर असलं, तरीसुद्धा आपलं मूळ गाव काटेवाडी आहे. सर्वांत दबाव काटेवाडी, कन्हेरीमध्ये झाला. इथल्या अनेक स्थानिक पुढाऱ्यांकडून झाला. तुम्हाला सोपा प्रश्न आहे, की साहेब बारामतीचे नसते, तर आज बारामती अशी असती का? साहेबांमुळे बारामतीचा खरा विकास झाल्याचे यावेळी युगेंद्र पवार यांनी नमूद केले.
मंत्रालयात तुम्ही काटेवाडीचे आहेत असं सांगितलं, की लगेच खुर्ची आणि मान मिळतो. आताच्या वेळी पैशांचा वापर झाला; पण ३ महिन्यांनी तुम्ही त्यांना दाखवून द्या, की १०० मतांनी आपण पुढे कसं पाहिजे.’ तुम्ही अजिबात कमी पडला नाहीत, तुम्हाला धन्यवाद म्हणतो, अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत दिले.