
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत लक्ष्मण हाके वडगोद्री येथे गेल्या ८ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा ९ वा दिवस आहे. सरकार म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मनोज जरांगे म्हणतात आम्ही ओबीसीत आलो. मग नेमकं खोटं कोण बोलतय?, असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर होते. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची भूमिका आहे, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले. आज मुंबईत संध्याकाळी ५ वाजता याबाबत मिटींग होणार आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणा करत सरकारवर संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. शिष्टमंडळातील नेत्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असं लक्ष्मण हाके यांनी ठामपणे सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट द्यावी, एका समाजाला रेड कारपेट आणि आमच्यावर अन्याय का? कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करणे बंद करा, अशी मागणी देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आणि चर्चा करणार आहे. त्यानंतर हाके यांना सांगितले जाईल आणि उपोषणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे सरकारने सांगितले.
लक्ष्मण हाके यांच्याकडून जे शिष्टमंडळ मुंबईला चर्चा करायला जाणार आहे. यामध्ये धनंजय मुंडे, प्रकाश शेंडगे, छगन भुजबळ असतील. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील फोनवरुन लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला.
