पिंपरी : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडे भोसरी, खेड, जुन्नर, आंबेगाव व हडपसर असे पाच आमदार विरोधात असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी एकतर्फी मैदान मारून शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा दबदबा वाढविला आहे. त्यातच भोसरी विधानसभेत लक्षवेधी मतदान मिळाले आहे. यामुळेच खऱ्या अर्थाने भोसरी विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांची आशा वाढलेल्या आहेत. महायुतीकडून भोसरी मतदारसंघ भाजपला व पर्यायाने विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्याकडेच जाऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव – पाटील यांचा डॉ. कोल्हे यांनी सुमारे १ लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव केला आहे. डॉ.अमोल कोल्हेंच्या विजयामध्ये त्यांचे जन्मस्थान असलेला जुन्नर तालुका अग्रस्थानी राहिला आहे. एकीकडे कोल्हे यांना जुन्नरने सुमारे ५१ हजार ३९३ मतांचे मताधिक्य दिले तर आंबेगाव तालुक्यात शिवाजी आढळरावांवर ११ हजार ३६८ मतांनी पिछाडीवर राहण्याची नामुष्की ओढवली.
मतदारसंघातील शहरी भागातील हडपसरने कोल्हेंना तर भोसरीने शिवाजीराव आढळराव पाटलांना थोडे मताधिक्य दिले. भोसरी विधानसभा मतदारसंघात पाच लाख ५१ हजार ५८२ मतदारांची मतदान केले यात ९ हजार ५७२ मतांचे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळाले आहे. याच मदातानाच्या गणितामुळे मागील दहा वर्षापासून आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात कोणालाही मताधिकचे मिळाले होते मात्र लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभेत मतदान सम समान प्रमाणावर आले आहे. यामुळेच भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही पदाधिकारी यांनी थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भोसरीमध्ये नव्या चेहऱ्यानी दंड थोपटले….
राज्यात महायुती सरकारमध्ये सत्तेत सहभागी असणारे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा लढणार म्हणून सोशल मीडियावर जोरदार ब्रॅण्डिंग सुरू केले आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, रवी लांडगे, उद्योजक विशाल जाधव यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून माजी नगरसेवक सुलभा उबाळे, वंचित कडून गुलाबराव पानपाटील, मनसे कडून सचिन चिखले यांनीही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

विधानसभेसाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी एकेरी लढत झाली तर निवडणूक एकतर्फी होणार नाही हे लक्षात घेऊन विद्यमान आमदार महेश लांडगे हे कामाला लागले आहेत. सध्या महायुतीमध्ये असणारे काही इच्छुक महाविकास आघाडीच्या तंबूत जाऊन विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. महाविकास आघाडीला मिळाल्या मतांच्या टक्केवारीत वाढ करून भोसरीचा गड महाविकास आघाडी खेचून एक युवा चेहरा “डॉक हॉर्स” म्हणून पुढे आणून ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार का? हे पाहावे लागणार आहे.




