पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहरात आज रविवारीच्या सायंकाळी चिंचवड, चिखली, आकुर्डी, मोहननगर, संभाजीनगर पूर्णानगर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच पावसाचा जोर एवढा मोठा होता की अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याची तळी साचली, गटारीही तुंबली. परिसरात चार ठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्याचबरोबर एका तासात ११४ मिमी पावसाची नोंद पहिल्यांदाच घडल्याची घटना आहे.

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. रविवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये उकडा जाणवत होता. दुपारी तीननंतर आकाशामध्ये ढग जमायला सुरुवात झाली. सव्वाचारच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.
या भागात झाली अतिवृष्टी!
शहराच्या विविध भागांमध्ये पाऊस पडला. त्यामध्ये चिंचवड लिंक रस्ता, मोहननगर स्पाईन रोड, पूर्णानगर, आकुर्डी परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्याचे नागरिकांचे मत आहे. मात्र, याबाबत कोणतीही नोंद नाही. सायंकाळी साडेचार ते सव्वा पाच या वेळेत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहर परिसरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पावसाळी गटारे तुंबल्याचे दिसून आले. विविध भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याचेही नागरिकांनी फोन आपत्ती व्यवस्थापनास कळविले होते. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध भागांमध्ये जाऊन पाणी काढण्यास मदत केली.
झाडे कोसळली !
आकुर्डी प्राधिकरणातील गुरुद्वारा चौकामध्ये रस्त्यावर झाड पडले होते. तसेच संभाजीनगर परिसरातील बजाज स्कूल जवळ, घरकुल कडून साने चौकाकडे जाणाऱ्या स्पाईन रोडच्या दोन्हीही बाजूला तसेच आकुर्डी खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढताना अडचण झाली. पिंपरी ते चिंचवड लिंक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.




