विराट कोहलीच्या ७६ धावांच्या जोरावर भारताने टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात १७६ धावा इतकी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर भारताने अवघ्या ७ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावले आहे. संपूर्ण टी-२० विश्वचषकात शांत असलेली विराट कोहलीची बॅट तळपली आणि त्याच्या बॅटमधून बारतासाठी मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाली. विराट कोहलीने ५९ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह ७६ धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीसह विराटने रोहितचं म्हणणं खरं करून दाखवलं आहे. या विजयासह भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने मोठे वक्तव्य करत टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

विराट कोहलीच्या या शानदार ७६ धावांच्या खेळीसाठी त्याला अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर बोलताना विराट कोहलीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आणि सांगितले, “हा माझा शेवटचा वर्ल्डकप आहे. हा माझा शेवटचा टी२० सामना आहे. विश्वविजेतेपदासह टी२० कारकीर्दीला अलविदा करण्याचा मी निर्णय घेतला आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटू शकतं की एकही धाव होणार नाही, पण काही दिवस तुमचे असतात. देवाचे आभार मानतो. मी संघाच्या विजयाच्या योगदान देऊ शकलो याचं प्रचंड समाधान आहे.
अंतिम सामन्याच्या संधीचं सोनं करायचं होतं. मला भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा होता. परिस्थितीचा आदर करत मी खेळायचं ठरवलं. मी भारतासाठी शेवटचा टी२० सामना खेळलो. नव्या पिढीकडे मशाल सोपवण्याची वेळ आली आहे. युवा खेळाडू या जबाबदारीसाठी सज्ज आहेत. अंतिम सामन्यात ५९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. ही खेळी भारतासाठी महत्त्वाची ठरली. तो या सामन्याचा सामनावीरही ठरला. पण सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.




