मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या योजनांच्या पुढे मुख्यमंत्र्यांचे नाव असल्याने आपोआपच त्याचा लाभ शिंदेसेनेला मिळत आहे. या योजनांचे श्रेय घेण्यासाठी शिंदेसेनेने सर्वत्र पोस्टरबाजी देखील सुरू केली आहे. अर्थात या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेही फोटो आहेत.
अर्थसंकल्पात लक्षवेधी ठरलेल्या योजनांचे श्रेय घेण्यासाठी आता महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला, आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांची घोषणा केल्यानंतर तासा-दोन तासातच शिंदेसेनेने मुंबईत पोस्टबाजी करत या योजनांचे श्रेय घेण्याचा जोरदार प्रयत्न केला.
शिंदेसेना एवढ्यावरच थांबलेली नसून लवकरच राज्यभर असे पोस्टर लावले जाणार आहेत. मदतीचा हात एकनाथ, असा मजकुर असलेले हे पोस्टर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेही फोटो असले तरी मदतीचा हात एकनाथ, हे वाक्य शिंदेसेना श्रेय घेत असल्याचे प्रकर्षाने दर्शवत आहे.
दरम्यान, भाजपाने देखील अर्थसंकल्पाचे श्रेय घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपा प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत अर्थसंकल्पाने जनहित कसे साधले आहे
ते १० जुलैपर्यंत जनतेत जाऊन सांगण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते. अजित पवार यांनी कसे लोकाभिमुख निर्णय घेतले त्याची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून देण्यासाठी अजित पवार गट देखील सरसावला आहे.



