
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माझ्याशी गैरव्यवहार करत मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. प्रसाद लाड यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
“राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदुत्त्वाबाबत जे विधान केलं आहे. त्यावर विधान परिषदेत बोलताना मी राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव मांडत तो लोकसभेत पाठवावा तसेच त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी केली. त्यानंतर अंबादास दानवे हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले, तेव्हाही मी भाषण करत होतो. त्यावेळी अंबादास दानवे यांनी माझ्याशी गैरव्यवहार करण्यास सुरूवात केली. त्यांनी मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली”, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला. तसेच अंबादास दानवे यांनी हिंदुंचा अपमान केला असून त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया
दरम्यान, प्रसाद लाड यांच्या आरोपावर अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली. “विधान परिषदेत बोलताना माझा तोल सुटलेला नाही. मी एक शिवसैनिक आहे. जो माझ्यावर बोट दाखवेल, त्यांची बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे. ज्या विषयाचा सभागृहाशी संबंध नाही, त्याविषयावर माझ्याकडे हातवारे करून ते बोलत होते”, असे अंबादास दानवे म्हणाले.



