
नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी तब्बल 30 तासानंतर संपली असून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजय घोषित केले आहे. दराडे यांना विजयी घोषित केल्यानंतर महायुतीचे पदाधिकारी आणि दराडे यांच्या समर्थकांनी जल्लोष आहे केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले आहे.
विजयी उमेदवार किशोर दराडे हे पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रातून शिक्षक मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीसाठी हा विजय सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. या संदर्भात किशोर दराडे यांनी शिक्षकांचे आभार मानले आहे. तर उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊ चौधरी यांनी महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा किशोर दराडे यांना फोन
किशोर दराडे यांना विजयी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भाऊ चौधरी यांच्या फोनवरून दराडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. यावेळी साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उभाठा तीन नंबरवर. महाविकास आघाडीचा दारुण पराभव करून मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो, असे किशोर दराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितले.



