पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घेऊन बीबीए, बीसीए पदवी अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या महाविद्यालयांनी शुल्काबाबत मनमानी करू नये यासाठी ‘एआयसीटीई’ने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या अभ्यासक्रमासाठी कमीत कमी किती शुल्क असावे याबाबत समितीकडून शिफारस केली जाणार असून, त्यानुसार मार्गदर्शक शुल्क जाहीर केले जाणार आहे.
‘एआयसीटीई’चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम यांनी ही माहिती दिली. ‘एआयसीटीई’च्या अधिपत्याखाली या शैक्षणिक वर्षापासून बीबीए, बीसीए अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. मात्र, या अभ्यासक्रमांना आता ‘एआयसीटीई’चे निकष लागू होणार असल्याने या अभ्यासक्रमांचे शुल्क वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘एआयसीटीई’कडून या अभ्यासक्रमांचे मार्गदर्शक शुल्क जाहीर करण्यात येणार आहे.
प्रा. सीताराम म्हणाले, ‘बीबीए, बीसीएसाठीचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या अंमलाबाबत मार्गदर्शक सूचना, नियमावलीही केली आहे. त्यात पुढील दोन वर्षे बदल होणार आहे. या काळात शिक्षण संस्थांची तपासणीही केली जाणार नाही. मात्र, त्या पुढील काळात अभियांत्रिकी, एमबीए महाविद्यालयांप्रमाणे तपासणी केली जाईल.
बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांसाठी कमीत कमी शुल्क किती असावे याबाबत शिफारसी करण्याबाबत समिती स्थापन केली आहे. राज्यांनीही शुल्क निर्धारण समितीच्या माध्यमातून शुल्क निश्चित करावे. तसेच मार्गदर्शक शुल्क विचारात घेऊन शुल्काबाबतचे धोरण ठरवावे.



