मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट पेपरफुटी प्रकरणात नवीन माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी गंगाधर दिल्ली नव्हे तर आंध्र प्रदेशात काम करत आहे. बंगळुरूतील सीबीआयच्या टीमने त्याला अटक केली आहे. 10 विद्यार्थी आणि पालकांनी सीबीआयशी संपर्क साधून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे.
कशाप्रकारे संजय जाधव आणि जलील पठाण हे त्यांच्याकडून पैसे घेत होते. हे पैसे पुढे गंगाधरला पाठवले जायचे. त्यासाठी मध्यस्थ होता तो इराण्णा कोंगलवार. त्यामुळे, पोलिसांकडून संजय जाधव, जलील पठाण आणि इराण्णा कोंगलवार यांचे बँक व्यवहार तपासण्यात आले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी लातूरमधील आरोपी, शिक्षक जलील पठाण याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी संजय जाधव यास दोन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. या महिन्यातील 2 तारखेला संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांनाही 4 दिवसाची सीबीआय कोठडी देण्यात आली होती.
त्यानंतर आज दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आले असता जलील पठाण यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी तर संजय जाधव यास दोन दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.



