सातारा: लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे १० पैकी ८ खासदार निवडून आले. या यशानंतर शरद पवार गटात इन्कमिंग सुरु झाली आहे. दरम्यान अजित पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांनी काही वेळापूर्वी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांना विचारण्यात आले की अजित पवार गटाचे नेते तुमच्या संपर्कात आहेत का? त्यावर पवार म्हणाले, माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही. जयंत पाटील यांना ते लोक भेटतात, याची मला माहिती आहे. याचे परिणाम विधानपरिषद निवडणुकीत पाहायला मिळतील.
ते पुढे म्हणाले, ” शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते ज्या पद्धतीची भाषणं करत होते, त्यामुळे जातीय आणि धार्मिक कट्टरतावादी शक्ती उफाळून आल्या, समाजाचे नुकसान झाले, देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हेच त्यांचं निवडणुकीचे सूत्र होते. याच पद्धतीने त्यांना निवडणुका लढायच्या व जिंकायच्या होत्या. मात्र देशातला सामान्य माणूस हा राजकारण्यांपेक्षा अधिक शहाणा झाला आहे. त्यामुळेच त्यांनी संविधान वाचवण्याचा निर्णय घेतला. काही लोक अतिरेकी वृत्तीने निवडणूक काळात लोकांसमोर गेले. लोकांना चुकीच्या मार्गाने नेत होते. मात्र मतदारांनी त्यांचा डाव हाणून पाडला. उद्याच्या निवडणुकीत यासंदर्भात राज्यात जे काही करण्याची गरज असेल ते इथले मतदार नक्कीच करताना दिसतील, असे शरद पवार यांनी सांगितले.


