पिंपरी : लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज पदाचा राजीनामा देऊन पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात बॉम्ब फोडला. आता चिंचवड विधानसभेतील अजित पवार गटातील कार्यकर्त्यांचे आऊट गोईंगसाठी काउंट डाऊन सुरू झाले आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला. बहुतांश पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांच्यासोबत राहिले. अनेक नगरसेवकांनी अजितदादा यांच्याकडून अनेक विकास कामे आणि आर्थिक कामे करून घेतली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दहा लोकसभापैकी 8 लोकसभेचे उमेदवार निवडून आल्यामुळे अजित पवार गटातील अनेक नेत्यांचे राजकीय गणित फिस्कटले. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघापैकी पिंपरी वगळता भोसरी व चिंचवड मतदार संघात महायुतीतील घटक पक्ष असणारे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी अजित पवार गटाला या मतदारसंघात आपले उमेदवार देता येणार नाहीत.
नेमका याच फॉर्मुलामुळे भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील इच्छुक नेतृत्वाने विधानसभेसाठी आपापल्या वाटा शोधण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसापासून याची चिंगारी पेटत असताना आज भोसरी विधानसभेतील अजित पवार गटाचे नेतृत्व व विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तुतारी फुकली. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष राहुल भोसले व भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
चिंचवडची पोटनिवडणूक लढवत अल्पावधीत लाखाचे मतदान मिळवलेले माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांची चर्चांना सुरुवात झाली आहे. आता चिंचवड विधानसभेत नाना काटे काय निर्णय घेणार याची चर्चाना जोर धरू लागली आहे.




