मुंबई: नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने दमदार विजय मिळवला होता. विधानपरिषदेच्या ११ जागांपैकी ९ जागांवर महायुतीला यश मिळाले. तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांना यश मिळालं.विधान परिषदेच्या या निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांची लवकरच वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.
याकरता राज्य सरकारने पावलं उचलली असून ही नावं लवकरच जाहीर केली जाणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीमध्ये या 12 आमदारांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
राज्यपाल नियुक्त जागांसाठी महायुतीचा फॉर्मुला ठरला
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांकरता महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती महायुतीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यानुसार भाजप 4, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट 2 आणि उर्वरित 4 हे राज्यातील नामवंत तज्ज्ञ असतील, असं सांगतिलं जात आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 11 आमदारांच्या निवडणुकीप्रमाणे याही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत महायुतीतील काही राजकीय नेत्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याचंदेखील बोललं जात आहे.
राज्य सरकारकडून हालचाली सुरु
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या विधान परिषदेत अगदी थोड्याच आमदारांसह कामकाज सुरू आहे. असं असताना नुकत्याच झालेल्या 11 जागांकरिता निवडणुकीतून 11 आमदार विधानपरिषद आलेत तर आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची देखील लवकरच विधान परिषदेमध्ये वर्णी लागेल. याकरता राज्य सरकारने पावले उचलली आहेत. हे गणित विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे, असं म्हटलं तरी वागव ठरणार नाही. कारण विधानसभा जितकी महत्त्वाची आहे, विधानसभेतील संख्याबळ जितकं महत्त्वाचं आहे तितकच संख्याबळ आणि तितकंच महत्त्व किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्व हे विधान परिषदेला आहे हे आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांना समजलं आहे. त्यामुळे विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रक्रियेला वेग आला.



