पिंपरी : पिंपरीगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाली. मंगळवारी (१६ जुलै) मध्यरात्री अशोक थिएटरजवळ वाहनांची तोडफोड झाली होती. त्यानंतर बुधवारी (१७ जुलै) पहाटे डेअरी फार्म रोडवर चार वाहने फोडण्यात आली आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी गाव येथील डेअरी फार्म रोडवर चार वाहनांची तोडफोड झाली आहे. तीन जणांनी मिळून ही तोडफोड केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान मंगळवारी पहाटे पिंपरी गावातील अशोक थिएटरजवळ काही वाहनांची तोडफोड झाली होती. यामध्ये पिंपरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी त्याच परिसरात पुन्हा तोडफोड झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून सतत वाहनांची तोडफोड केली जात आहे. वाकड परिसरात वाहन तोडफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. वाकड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड झाली आहे. तापकीर चौक, काळेवाडी येथे दोघांनी रविवारी (१४ जुलै) मध्यरात्री पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली आहे. त्यापूर्वी ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे १० जुलै रोजी एका टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. आता पुन्हा तोडफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे.