
बारामती : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवल्या. त्यातील 8 जागांवर त्यांना विजय मिळवण्यात यश आलंय. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मोठा विजय मिळवला होता. नंतरच्या दिवसांत स्थानिक कार्यकर्त्यांनी “आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे”, अशी मागणी शरद पवारांकडे सातत्याने केली होती. शिवाय, बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवलं जाईल, अशाही चर्चा आहेत. दरम्यान, आता युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.
युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीबाबत काय काय म्हणाले?
“मी निवडणूक लढावी, अशी लोकांची इच्छा असेल तर आपल्याला विचार करावा लागेल, पण आत्तापर्यंत अजून ठाम निर्णय घेतलेला नाहीये. अजून हा निर्णय घेण्याची वेळ आलेली नाहीये. अजून निवडणुकीसाठी 90 दिवस राहिले आहेत. त्यामुळे बघू “, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार म्हणाले. ते बारामतीमध्ये बोलत होते.
कोण आहेत युगेंद्र पवार ?
युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांनी थेट अजित पवारांविरोधात प्रचार केला होता. बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन अजित पवार आणि युगेंद् पवारांमध्ये टीका टीप्पणीही झाली होती. शरयू अॅग्रोचे सीईओ म्हणून युगेंद्र पवार जबाबदारी पाहातात. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना या पदावरुन हटवण्यात आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी सातत्याने शरद पवारांना साथ दिली आहे.




