पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाला मंगळवारी सनसनाटी वळण लागले आहे. खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. दिवसे आणि अन्य अधिकाऱ्यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी दिवसे यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार दिली होती.
पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांमध्ये जबाब नोंदविला आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे. पूजा खेडकर यांची सोमवारी तीन डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर पूजा खेडकर यांनी जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात पोलीस पूर्ण चौकशी करणार आहेत. त्यानंतर डॉ. दिवसे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
वाशिम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी खेडकर यांची वाशिम येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खेडकर यांनी दिवसे यांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार नोंदवली . पूजा खेडकर यापूर्वी पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची मागच्या आठवड्यात वाशिममध्ये बदली करण्यात आली. त्यांच्यासंबंधीची वेगवेगळी प्रकरणे उघडकीस आल्यानंतर खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी स्थगित करण्यात आला आहे.
डॉ. सुहास दिवसे यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झाली आहे. ते २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दिवसे यांनी जिल्हाधिकारी होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. क्रीडा आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त तसंच उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलं आहे. पूजा खेडकर यांच्या विरोधात सुहास दिवसे यांनी सर्वप्रथम तक्रार दाखल केली होती. प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांनी स्वतंत्र गाडी, बंगला, कर्मचारी, सुरक्षा, शिपाई, स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. मात्र प्रशिक्षणार्थी पातळीवर या सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच खेडकर यांनी आपल्या खासगी ऑडी गाडीवर लाल रंगाचा दिवा लावला होता. या सर्व प्रकारानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून या संदर्भात तक्रार केली होती. त्यात आता खेडकर यांच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला सनसनाटी वळण लागले आहे. मुळात हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इतक्या दिवसांनी खेडकर यांनी तक्रार का नोंदविली असा सवालाही करण्यात येत आहे.


