पुणे : पावसाळा सुरू झाल्यापासून साथरोगांचा प्रसार वाढला आहे. सध्या लहान मुलांमध्ये फ्लूची साथ सुरू झाली आहे. ताप, सर्दी, उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे दिसून येत आहेत. याचबरोबर लहान मुलांना डेंग्यूचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
पावसाच्या दिवसात वातावरणात धुलीकणाची मात्र कमी होत असताना लहान मुलांमध्ये सर्दी, खोकल्याचे प्रमाण फारच वाढत असल्याचे बालरोगतज्ञांच्या निदर्शनास आले आहे. तुमच्या मुलांना सतत दम लागत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
गेल्या 5 दिवसांपासून पावसाची एक मुसळधार सर येत आहे. जुलै महिन्यात पावसाने कहरच केला. जुलै महिन्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये फ्लूची साथ आली होती. मुंबईत मोठ्यांमध्ये अजूनही सतत तापाच्या तक्रारी दिसून येत आहेत, तर पाच वर्षांच्या मुलांमध्ये सर्दी आणि खोकला जास्त दिसून येत आहे, असे जनरल फिजिशयन सांगतात.
बालरोग तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच मुलांना श्वसन विकाराच्या समस्या जाणवत आहेत. वायरल निमोनिया आणि ब्रॉकिओलायटीस हे दोन आजार दिसून येतात. वायरल निमोनियामध्ये लहान मुलांच्या फुफ्फुसांना सूज दिसून येत आहे. ब्रॉकिओलायटीसमध्ये फुफ्फुसांना संसर्ग होतो. अनेकदा मुलांना ताप येत नाही पण चालताना धाप लागते. वातावरणात थंडावा वाटलं की त्याचा थेट परिणाम मुलांच्या श्वसन व्यवस्थेवर दिसून येतो. बरेचदा श्वसन विकाराचा व्याधी वाढत असताना नाक चोंदणे, सर्दी होणे, सतत शिंका येणे, उलट्या होणे असे प्रकार घडतात. सात दिवस आजार होतो, त्यानंतर बरा होतो, अशी माहिती बालरोग तज्ञ देतात. श्वसनात अडथळे येत असेल, तर तातडीने रुग्णालयात मुलांना दाखल करा, असेही डॉक्टरांनी सांगितले.



