मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे वसाहतीमधील कारशेडच्या बांधकामामुळे आरे वसाहत आणि अंधेरी पूर्वेला जोडणाऱ्या मरोळ – मरोशी रस्त्यावरील परिसर, तसेच आरे आणि पवईला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पाणी जिथे साचते ते ठिकाण आरेतील कारशेडपासून खूप लांब आहे, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (एमएमआरसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

 

आरे वसाहतीचा रस्ता आणि कारशेडची जागा दोन्ही सखल भागात आहेत. कारशेड बांधण्यासाठी ३३ हेक्टर क्षेत्रात जमीनभरावाची कामे करण्यात आली आहेत. तसेच कारशेडच्या हद्दीत एक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून हा प्रवाह एमएमआरसीएलने वळवल्याने गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता पाण्याखाली जात असल्याचा आरोप ‘सेव्ह आरे’च्या अमरिता भट्टाचार्य यांनी केला आहे.