मुंबई : एका तरुणाचा शिवडी स्टेशनवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर याच महिन्यात व्हायरल झाला होता. मुंबई लोकल सुरु असताना हा तरुण लोकलला लटकून पाय घासत जातो आणि प्लॅटफॉर्म संपल्यावर लोकलमध्ये चढतो असं या व्हिडीओत दिसत होतं. या तरुणाचा शोध लागला आहे, दुसऱ्या एका स्टंटमध्ये या तरुणाला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे. त्यामुळे आता त्याने असे स्टंट करु नका असं आवाहन केलं आहे. मध्य रेल्वेने  या तरुणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच असे स्टंट करु नका हे आवाहन केलं आहे. मराठी भाषेत मोरा तुझे गेले पाय, आता रडून उपयोग काय? अशी एक म्हण आहे त्याचा तंतोतंत प्रत्यय या घटनेने तरुणाला दिला आहे यात शंकाच नाही.

 

१५ जुलैला व्हायरल झालेल्या व्हिडीओत काय?

 

लोकल ट्रेनच्या दारात लटकून तरुण स्टंट करताना दिसतो आहे. लोकल सुरु झाली आहे. त्या धावत्या लोकलमधल्या एका डब्याच्या खांबाला पकडून हा तरुण प्लॅटफॉर्मवर पाय ठेवून वेगाने जाताना दिसतो आहे. त्याला डब्यातले लोक सांगत आहेत की असं करु नकोस तरीही तो कुणाचंही ऐकत नाही. शेवटी प्लॅटफॉर्म संपायला येतो तेव्हा घाईने तो डब्यात चढतो आहे. अशा हुल्लडबाज प्रवाशांमुळे शिस्तीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या. अशा स्टंटबाजांना आवरा, हवेत कशाला जीवघेणे स्टंट?, असे लोक स्वतःची माती करुन घेतात अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी या व्हायरल व्हिडीओवर दिल्या. मुंबई मध्ये अनेकदा असे स्टंट करताना तरुण दिसतात. त्यांनी असे स्टंट करु नयेत असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.