पिंपरी : अतिवृष्टीमुळे शहरातील विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर नदीकाठच्या घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे 4 हजार 500 नागरिकांना महानगरपालिकेने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते. पूर परिस्थिती निवळल्यानंतर रस्ता तसेच परिसरात साचलेला गाळसदृश कचऱ्याची महापालिकेच्या पथकाने संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे 850 नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा, आंबेडकर कॉलनी, मेवाणी हॉल, निराधार हॉल पिंपरी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चिंचवड येथील तानाजीनगर, काळेवाडी येथील पवनानगर, रावेत येथील समीर लॉन्स, शिंदे वस्ती रस्ता, जाधव घाट आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून 200 नागरिकांना काळेवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत, 70 नागरिकांना मनपा चापेकर शाळा, उर्दू शाळा व भोईल हॉल येथे तर 150 नागरिकांना वाल्हेकरवाडी येथील नवीन प्राथमिक शाळा इमारत येथे स्थलांतरित करण्यात आले.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत लक्ष्मीनगर, पवार वस्ती, भुमकर वस्ती, चोंदे घाट, शिक्षक सोसायटी, लक्ष्मी कॉलनी, ओम शिव कॉलनी, दत्तमंदिर रोड, पिंपळेगुरव, भुजबळ वस्ती, वाकड आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून 230 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर, बोपखेल येथे 20 ते 25 घरांमध्ये तीन ते चार फुट पाणी शिरले होते. याठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे 170 नागरिकांचे मनपाच्या बोपखेल येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरण करण्यात आले आहे.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत घरकुल, श्रीराम कॉलनी, तळवडे, डिफेंस कॉलनी, पाटीलनगर, चिखली आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले. या ठिकाणांहून साचलेले पाणी तसेच घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यात आले आहे. तसेच 25 नागरिकांना जवळच्या रिक्त फ्लॅटमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधी नगर, आंबेडकर नगर, सुभाष नगर, वाल्मिकी आश्रम, पवना नगर, जगताप नगर, संजय गांधी नगर या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे 523 नागरिकांना कमला नेहरू शाळा, पिंपरी येथे, 550 नागरिकांना रहाटणी शाळा येथे, 110 नागरिकांना थेरगाव शाळा येथे तर 55 नागरिकांना विवेकानंद बॉक्सिंग हॉल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी, भारत नगर, फुगेवाडी, दापोडी परिसर मुळानगर, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून 200 नागरिकांचे कासारवाडी उर्दू शाळेत, सुमारे 300 नागरिकांचे मीनाताई ठाकरे महापालिका शाळेत, सुमारे 250 नागरिकांचे दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग महापालिका शाळेत स्थलांतर तर सुमारे 350 नागरिकांचे जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्याप शहरातील विविध ठिकाणी नियंत्रण पथके तैनात असून बचावकार्य सुरू आहे.
शहरातील विविध ठिकाणी साठलेले पाणी निवळल्यानंतर आज महापालिका पथकाच्या वतीने शहरातील विविध भागात तुंबलेल्या चेंबर्सची स्वच्छता करणे, रस्त्यावरील गाळ काढणे, नदीकाठी जमा झालेल्या कचरा तसेच गाळ जेसीबीच्या सहाय्याने हटविणे, माती साचलेल्या ठिकाणी पाणी फवारणी करून स्वच्छता करणे, विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन आणि आदी व्यवस्था करणे अशी विविध कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शहरातील मनपा बोपखेल शाळा, मोशी, निगडी घरकुल, पिंपळेगुरव, जुनी सांगवी बोपोडी रस्ता आदी परिसरांचा समावेश होता.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती हाताळताना आवश्यक उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालयांस प्रत्येकी 5 लाख याप्रमाणे एकूण 40 लाख रुपयांचा निधी रोख स्वरूपात देण्यात आला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे. शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले. बचावकार्य करत असताना अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था तसेच पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने रोख स्वरूपात निधी दिला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.