
छत्रपती संभाजीनगर : “काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर ‘भ्रष्टाचाराचा सुभेदार’ असं म्हणत टीका केली. पण ज्यांनी ही टीका केली, त्या देशाच्या गृहमंत्र्यांना कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून तडीपार करण्यात आलं होतं. गुजरात दंगल प्रकरणी कोर्टानं तडीपार केलं, तो व्यक्ती आज देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतोय, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केली. तसंच “राजेश टोपे म्हणाले, माझं बोट धरुन ते राजकारणात आले. मात्र, त्यावर माझा विश्वास नाही. कारण नरेंद्र मोदी देखील असं म्हणाले होते. पण मला माझ्या बोटावर विश्वास आहे,” असा खोचक टोलाही शरद पवार यांनी लगावला.
मराठा आंदोलकांनी घेतली भेट
शुक्रवारी शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी आंदोलकांनी भेटीचा आग्रह धरला. तसंच भेट झाली नाही, तर आम्ही रत्यावर येऊन आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, शरद पवार यांनी भेटीला वेळ दिली. जवळपास पाऊण तास त्यांनी चर्चा केली. सरकार मनोज जरांगे आणि आंदोलकांशी काय चर्चा करते, याबाबत विरोधकांना माहिती देत नाही. त्यामुळं नेमकं काय सुरू आहे, हे कळत नाही. सरकारनं सर्व पक्षातील लोकांना आमने-सामने बसून चर्चा करायला हवी. सरकारनं जर ओबीसींमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही सोबत राहू, असं शरद पवार म्हणाले, असं आंदोलकांनी बैठकीनंतर सांगितलं.



