पुणे : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज्यातील नेत्यांनी यावर अनेकदा प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील जातीय संघर्षावर टीप्पणी केली आहे. व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या एका व्यंगचित्राचा हवाला देत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. तसेच आज त्यांनी व्यंगचित्रकार शि. द फडणीस यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्यानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभाग घेतला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील जातीय संघर्षावर मार्मिक भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
शि. द फडणीस यांचे एक व्यंगचित्र आहे. या व्यंगचित्रात एक मांजर आहे आणि तिची पिल्लं दूध पित आहेत. त्यात एक उंदीरदेखील आहे. एक वात्सल्याचा तो भाव आहे. जर आज मी ते व्यंगचित्र करायला घेतलं, तर मी दाखवीन की मांजर तिथेच आहे. पिल्लं अंगावरच्या पट्य्यांमुळे भांडत आहेत. मी या जातीचा, तू कोणत्या जातीचा? बाकी सर्व उंदीर दूध पित आहेत आणि ती मांजर म्हणजे महाराष्ट्र आहे, असे राज ठाकरे म्हणाले.



