मुंबई : गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण केले आहे. प्रत्येकवेळी “तारीख पे तारीख” देऊन सरकारनेही मराठा आरक्षणाबाबत ठोस उपाय केलेला नाही. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण दिले असले तरीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाच्या सर्वच मागण्या मान्य झाल्याचंही म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे आंदोलन काळात मराठा समाजातील मुलांवर लावलेले गुन्हे मागे घेणे, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करणे आदी मागण्याही प्रलंबित आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता आंदोलन मागे घेतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या चर्चेवर मनोज जरांगे पाटलांनी आता मौन सोडलं आहे.
गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “गुन्हे मागे घेण्याबाबत शिष्टमंडळाने काही सांगितलं नाही. मी त्यांना सांगितलं आहे की सरसकट गुन्हे मागे घेतले पाहिजेत. यासाठी त्यांचा आमदारही साक्षीदार आहे.
मीडियासमोर मी विचारलं होतं. सरसकट गुन्हे मागे घेण्याची मागणी आहे. आजपर्यंतचे सर्व गुन्हे माफ करायचे. कारण आमची पोरं त्यात नाहीत, विनाकारण त्यांना गुंतवण्यात आलं आहे. ही पोरं मुंबई पुण्यात शिकायला गेली आहेत, तरीही त्यांना यात गुंतवलं आहे. राजकीय द्वेषापोटी त्यांना गुंतवलं आहे. असं मनोज जरांगे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “स्थानिक जिल्ह्यातील आमदार जबाबदार आहेत. त्यांनीच आगीत तेल ओतण्याचं काम केलं. आम्ही घाबरलो पाहिजे यासाठीच त्यांनी गुन्हे दाखल केले होते.



