
पानशेत आणि वरसगाव धरणात रविवारी (ता. ४) पहाटे दोन वाजल्यानंतर झालेल्या पावसामुळे चार वाजण्याच्या सुमारास पाणीपातळी वाढली. सकाळी धरणाच्या भिंतीच्या परिसरात चार तास अतिवृष्टी झाली अन् पाणीपातळी वाढल्याने दोन्ही धरणातून दिवसभरात टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढला.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही धरणातून प्रत्येकी बारा हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडावा लागला. खडकवासला धरणातून पाच वाजता ४५ हजार क्युसेक विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला. खडकवासला धरणात १.६९ टीएमसी म्हणजे ८५.५३ टक्के पाणीसाठा जमा आहे. कालव्यातून एक हजार पाच क्युसेक, तर मुठा नदीत ४५ हजार ७०५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४६ मिलिमीटर पाऊस झाला.
वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून…
खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने जास्त पाणी सोडणार असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती घेतली. पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप हे दुपारी तीन वाजता खडकवासला धरण परिसरात आले. त्यांनी धरण साखळीतील चारी धरणांची सध्याची परिस्थिती, सकाळपासून पडलेला पाऊस आणि सोडण्यात येणारे पाणी याची माहिती घेतली. पावसाच्या प्रमाणानुसार धरणातील विसर्ग कमी-जास्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही वेळाने महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी पाहणी केली.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)


