
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे भरलेली आहेत. अशात खडवासला धरणातून मुळा-मुठा नदीत सतत सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे शहरातील नदी पात्रात असलेले ओंकारेश्वर मंदिर पाण्याखील गेले आहे. दरम्यान ओंकारेश्वर मंदिरात पाणी शिरल्याने आज यंदाच्या श्रावण महिन्यातील पहिल्याच दिवशी भाविकांना दर्शनाला मुकावे लागणार आहे.
सध्याच्या परिस्थित पुराचे पाणी हे मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात भाविकांना दर्शन घेता येणार नाही. मात्र, जर दुपारपर्यंत पुराचे पाणी ओसरले तर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाऊ शकते.
मुख्यमंत्री आज पुण्यात
गेल्या 15 दिवसांपासून पुण्यात सततच्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागांतील लोकांना पूराचा फटका बसला आहे. अशात हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मागच्या पूरावेळी मृत्यू झालेल्या दोन तरुणांना दहा लाखांची मदत केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय मदत जाहीर करणार याकडे पूरग्रस्तांचे डोळे लागले आहेत.



