मुंबई : सध्या शेअर बाजारात ऐतिहासिक पडझड झाली आहे. फक्त भारतीय शेअर बाजाराच नव्हे तर जगभरातील शेअर बाजार सध्या गटांगळ्या खात आहे. याच कारणामुळे भारतीय गुंतवणूकदारांचे एका झटक्यात दहा लाख कोटी रुपये बुडाले आहेत. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारचा प्रमुख निर्देशांक निफ्टी साधारण 3.12 टक्क्यांनी घसरला आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांकदेखील 3.14 टक्यांनी गडगडला आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने एवढी आपटी का घेतली असे विचारले जात आहे. शेअर बाजारातील पडझडीची पाच प्रमुख कारणं आहेत.
मंदीची भीती : जागतिक पातळीवरच्या घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडला आहे. सध्या जगातील महासत्ता म्हणून ओळख असलेला अमेरिका हा देश मंदीच्या कचाट्यात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंदीचे संकेत देणारा साहम रेसेशन इंडिकेटर सध्या 0.5 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं दिसतंय. जुलै महिन्यात अमेरिकेत नोकरभरतीत मोठ्या प्रमाणात घट झाली. गेल्या वर्षी याच काळात अमेरिकेत 2 लाख 15 लाख महिन्याला नोकऱ्या मिळाल्या मिळाल्या होत्या. या वर्षाच्या जुलै महिन्यात फक्त 1 लाख 14 हजार नव्या नोकऱ्या मिळाल्या. अमेरिकेत बेरोजगारी दरही वाढला आहे. अमेरिकेत मंदीचे संकेत असल्यामुळे सध्या जगभरातील गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत.
बँक ऑफ जपानचे चलनविषक धोरण : एकीकडे अमेरिकेत मंदीची भीती आहे. तर दुसरीकडे जपानची मध्यवर्ती बँक बँक ऑफ जपानने बुधवारी व्जाजदरात वाढ केली आहे. परिणामी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जपानीन येन या चलनाचे मूल्य वाढले आहे. याचाही परिणाम जगभरातील शेअर बाजारावर होत आहे.
इराण-इस्रायल यांच्यातील युद्धजन्य तणाव : सध्या मध्य-पूर्वेतील इराण-इस्रायल यांच्यात तणावाची स्थिती आहे. हमास आणि हिजबुल्लाह या गटाच्या प्रमुखांच्या हत्येमुळे इराण, हमास आणि हिजबुल्लाह यांनी इस्रायलला जबाबदार ठरवलं असून याचे प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सध्याच्या या तणावामुळे जगभरात तेलाच्या किमती भडकू शकतात. सध्या तेलाची मागणी घटली आहे, त्यामुळे तेलाचा दरही कमी झाला आहे. मात्र इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणावामुळे जगभरातील बाजरावर नकारात्मक परिणाम झाला आहे.
पहिल्या तिमाहीचे निकाल ; सध्या अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल नकारात्मक आले आहेत. निफ्टी 50 मध्ये सामील असलेल्या 30 कंपन्यांच्या वार्षिक कमाईत 0.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण नफ्यात मात्र 9.4 टक्क्यांची तिमाही घट झाली आहे. त्यामुळेदेखील भारतीय शेअर बाजारात सध्या नकारात्मक वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदार पाऊसमान, अर्थसंकल्प, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे चलनविषयक धोरण यांच्याकडे लक्ष ठेवून होते. पण या सर्व परिमाणांचे निकाल समोर आले आहेत. त्यामुळे आता शेअर बाजाराला उभारी देणारा कोणताही खास ट्रिगस दिसत नाहीये. त्यामुळेही शेअर बाजारात सध्या घट झाली आहे.


