पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (सोमवारी, दि. 5) पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. जुनी सांगवी परिसरातील मोठा नदी काठावरील भागाची पाहणी केली यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपची शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
रविवारी (दि. 4) हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात विशेषत: घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडला. पवना, कासारसाई, मुळशी यासह सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने पुणे पिंपरी चिंचवड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले.
पुराच्या पाण्याने जीवन विस्कळीत झाले या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराचा दौरा केला. जुनी सांगवी येथे पूर परिस्थितीची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे शहरातील पाटील इस्टेट आणि एकता नगर येथे पाहणी करण्यासाठी गेले.