पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पूरस्थितीचा आढावा घेतला.
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला असता पिंपरी चिंचवड शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. रविवारी (दि. 4) पहाटेपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढला. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याचा परिणाम पिंपरी चिंचवड शहरात झाला. सांगवी परिसरातील अनेक घरांमध्ये पवना नदीचे पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी केली. घरात पाणी शिरलेल्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे उपस्थित होते.



