आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनीही कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने काही दिवसांपूर्वीच जनसन्मान यात्रेची सुरुवात करत महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेण्यास सुरुवात केली असून विकासाचा अजेंडा घेऊन ते लोकांसमोर जात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज शिवनेरी येथून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आहे. त्यानिमित्त झालेल्या सभेत शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार गटावर टीकास्र सोडले.
अलिबाबा आणि ४० चोर तिकडे राहिले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आपल्या भाषणात अजित पवार गटावर टीका केली. “लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील नेत्यांना परतीचे डोहाळे लागले आहेत. ४२ आमदार गेले, त्यापैकी निलेश लंके लोकसभेपूर्वीच परत आले. जे आधीच परत आले, त्या सर्वांचे स्वागत आहे. पण जे ४१ राहिले आहेत, ते अलिबाबा आणि ४० चोरांची टोळी आहे. त्यामुळे या लोकांना आता परत घेऊ नका”, अशी मागणी शेख यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या भाषणातून केली.



