
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली आहे. आज त्यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर मनोज जरांगे नाशिकमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली असून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
मराठा मनोज जरांगे यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नरमधील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. शिर्डी येथून नाशिककडे जाताना मनोज जरांगे यांचे सिन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच सिन्नर शहरांमध्ये मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. सिन्नर येथील कार्यक्रमात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
समता परिषदेचे पदाधिकारी नजरकैदेत
समता परिषदेचे सिन्नर तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी या दोघांच्या निवासस्थानी जात पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले. सिन्नर पोलीस ठाण्यात या दोघांनाही स्थानबद्ध करण्यात आले आहे. मनोज जरांगे हे सिन्नरमधून बाहेर पडल्यानंतर या दोघांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा समता परिषदेकडून निषेध नोंदवण्यात येत आहे.
भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर कडकोट बंदोबस्त
मनोज जरांगे यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन अधिकारी आणि 20 हून अधिक अंमलदार भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. भुजबळांच्या घराभोवती बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे. तसेच घराभोवती जाणाऱ्या रस्त्यांवर देखील बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.



