
चिंचवड: चिंचवड येथील सोनिगरा दि मार्क या प्रकल्पाकरिता परवानगी पेक्षा जास्त अवैध गौणखनिज उत्खनन केल्या प्रकरणी ग्रो इंडिया रेसिडेन्सीचे भागीदार जितेंद्र सोनिगरा यांना ९ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. हा दंड तत्काळ भरण्याचे आदेश पिंपरी- चिंचवडचे अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिले आहेत.
तहसील कार्यालयाकडून ईटीएसद्वारे अचूक मोजणी करण्यात आली. त्यात कंपनीने १९ हजार ३६०.७६५ ब्रास बेकायदेशीरपणे माती, मुरूम असे गौणखनिज उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीच्या वतीने भागीदार जितेंद्र पनराज सोनिगरा आणि त्यांच्या भागीदारांमार्फत सोनिगरा दि मार्क या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
प्रकल्पासाठी त्यांनी ३२ हजार ६२८. ३०० ब्रास उत्खनन केले आहे. यामधील २७६७.५३५ इतका ब्रास साठा करून ठेवला आहे. कंपनीने केवळ १० हजार ५०० ब्रासचा तात्पुरता गौणखनिज उत्खनन व वाहतूक करण्यासाठी परवाना घेतला होता. मात्र, त्यांनी परवानगीपेक्षा अधिक गौणखनिज उत्खनन केल्याच्या तक्रारींची अपर तहसीलदार देशमुख यांनी दखल घेत पाहणी केली.
याबाबत सुनावणी घेतली. पाच पट दंड आकारून ९ कोटी ३३ लाख १८ हजार ८८७ रूपये दंड आणि ३४ लाख ५६ हजार ४५९ रूपये रॉयल्टी असा ९ कोटी ६७ लाख ७५ हजार ३४६ रूपयांचा दंड ग्रो इंडिया रेसिडेन्सी प्रा.लि. तर्फे भागीदार जितेंद्र सोनिगरा व इतरांना आकारण्यात आला आहे. ही दंडाची रक्कम तत्काळ शासनाकडे जमा करावी, असे आदेशात म्हंटले आहे.
” २ कोटी रुपयांची रॉयल्टी भरली आहे. तक्रारदार पैसे मागत असून अधिकाऱ्यांनी दबावातून नोटीस दिली आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक जितेंद्र सोनिगरा यांनी दिली आहे.




