मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका आगामी दोन महिन्यात लागू शकतात. त्या अनुषंगानं सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. एका बाजूला महायुती पुन्हा सत्तेत येण्यासाठी रणनीती आखत आहे, तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील घटक पक्षांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस विश्वासघातकी पार्टी असल्याचं म्हटलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही
शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार म्हणाले, “इतर लोक काय बोलतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देतो. इतरांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत नाही.
महेंद्र थोरवे दखल घेण्याच्या पात्रतेचे नाहीत
आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “महेंद्र थोरवे यांची मला दखल घेण्याची गरज नाही, त्यांना योग्य ते उत्तर स्थानिक पातळीवर आमचे नेते देतील. त्यांच्या आरोपानं मला काही फरक पडत नाही. कारण ते माझ्या मतदारसंघातील नाहीत.” महेंद्र थोरवे हे दखल घेण्याच्या पात्रतेचे नाहीत, असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला.


