
पिंपरी – किवळे येथील इंद्रप्रस्त हाऊसिंग सोसायटीत असलेली चार दुकाने आगीत भस्मसात झाली. ही घटना मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. कोणतीही जीवितहानी नाही.
किवळे येथील इंद्रप्रस्त हाऊसिंग सोसायटीत असलेल्या दुकानांना आग लागल्याची माहिती रितेश खांडेलवाल यांनी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास दिली. त्यानुसार पिंपरी चिंचवड अग्निशामक मुख्यालयातून तीन, प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्रातून एक, पीएमआरडीए अग्निशामक केंद्राचा एक आणि देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग लागलेल्या दुकानांचे शटर कुलूपबंद होते. त्यामुळे पावर कटर मशीनने शटर कट करण्यात आले. आगीवर होज व होज रील होजच्या साह्याने पाणी मारून आग पूर्णपणे शमविण्यात आली.
या आगीत पीजीडी कम्प्युटर्स, श्री दुर्गा प्रोव्हिजन, ओम गणेश इंटरप्रायझेस आणि श्री लक्ष्मी केरला स्टोअर आणि हॉटेल ही दुकाने भस्मसात झाली. या आगीत 70 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाजर चारही दुकानमालकांनी व्यक्त केला आहे.



