
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार तथा महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. रविवारी ते सांगलीत एका कार्यक्रमात बोलत होते. भाजप नेते सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सांगलीत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्जुन आहेत. तर, शरद पवार हे शकुनी मामा असल्याचं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या राजकीय टिप्पणीची सध्या राज्यभर चांगलीच चर्चा रंगली आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मविआचे सरकार पाडून महायुतीचे पुन्हा सरकार आणले. तर, राज्य कसं चालवायला हवं याबाबतचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पण, फडणवीस यांना सगळ्यांनी घेरलं. कारण फडणवीसच आपल्याला फाइट देऊ शकतात हे शरद पवारांना कळले आहे. त्यामुळेच राज्यात वेगवेगळी आंदोलने उभी करण्यात आली.”, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.



